भाविकांनी दिलेल्या देणगीच्या बनावट पावत्या केल्या, साईसंस्थानातील धक्कादायक प्रकार

Shirdi News: शिर्डी साई संस्थानमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संस्थानला येणाऱ्या देणगीत कर्मचाऱ्याने केली छेडछाड शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 1, 2023, 12:47 PM IST
 भाविकांनी दिलेल्या देणगीच्या बनावट पावत्या केल्या, साईसंस्थानातील धक्कादायक प्रकार title=
Sai Baba Mandir Fraud of Donors in Sai Sansthan using fake recipt

कुणाल जामदाडे, झी मीडिया

Shirdi News: साईसंस्थानच्या देणगी कक्षातच भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थानाच्याच कर्मचाऱ्याने हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

साईसंस्थानच्या देणगी कक्षात देणगीदारांनी दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन एकाचवेळी साई संस्थान आणि देणगीदारांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईबाबा संस्थानाची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झालं होतं. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना दिलेल्या रकमेच्या दोन भाग करून पावत्या देत आहे आणि त्यातील एक पावती बनावट असते. बनावट पावतीची संस्थानाकडे या रकमेची नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो, असे नमूद केले होते. निनावी पत्र मिळाल्यानंतर साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता या प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आलं आहे. 

देणगी कक्षात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत समोर आल्यानंतर साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साई संस्थानच्या देणगी कक्षातच भाविकांची फसवणूक होत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी कर्मचारी चासकर आतापर्यंत याने किती लोकांना बनावट पावत्या दिल्या? तसेच त्याला या गुन्ह्यात आणखी कुणाची साथ आहे का? याबात शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.