मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्याचवेळी कडक इशाराही देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी तीन जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ही ३७ झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा १०७० झाला आहे. काल नव्या तीन रूग्णांची भर पडलीय. आतापर्यंत ६६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ३३५ पेक्षा जास्त रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या ८० अॅक्टिव्ह कटेंनमेंट झोन आहेत.
रत्नागिरी जिल्हयात येणाऱ्या आणि जिल्हयातून बाहेर जावून पुन्हा परत येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आता पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जर नागरिकांनी सहकार्य केले नाही तर संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे संकेत जिल्ह्याधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.
तसेच प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन जसे विलगीकरण, मास्क न लावणे व गर्दी करणे याबाबत सूचनांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने, गरज पडल्यास लवकरच पुन्हा संपूर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करावी लागेल असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व जिल्हयातील जनतेला आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये, कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे अनुषंगाने लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. दुकाने ९ ते संध्याकळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरीच थांबा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#ratnagiri #WarAgainstVirus
24 तासात 21 नवे रुग्ण एकुण 1070
665 रुग्ण बरे झाले.
3 मृत्यू एकूण 37@MahaDGIPR @InfoDivKonkan @DMRatnagiri @advanilparab @samant_uday @MiLOKMAT @RatnagiriPolice @meanagha @AirRatnagiri @rajeshtope11 @maaykokan @RatnagiriPolice @AirRatnagiri pic.twitter.com/Not4OW70vt— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) July 16, 2020
परराज्यात, राज्यांतर्गत प्रवासाकरीता https://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करुन ई-पास प्राप्त करुन घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदरचे ई-पासचा वापर योग्य अतिमहत्वाच्या कामासाठीच करणे अपेक्षित आहे. यापुढे ई-पाससाठी योग्य कारणाशिवाय अर्ज केल्याचे, प्रवास केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्याबाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तिंना आरोग्य विभाग यांचेकडून दिलेल्या निर्देशानुसार १४ दिवस गृहविलगीकरण वा संस्थात्मक विलगीकरण राहणे बंधनकारक असल्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. जरी एकाच दिवशी जिल्ह्यातून बाहेर जाणे-येणे होणार असेल तरीही गृह, संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल आणि सदरचे विलगीकरण सबंधाने प्रवास्यांनी चेक पोस्ट वरील वैद्यकीय पथकातील अधिकारी, कर्मचारी याच्याशी हुज्जत घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने संबंधित चेक पोस्ट येथे प्रत्येक प्रवासी व्यक्तिकडून हमीपत्र घेणेत येणार आहे. तसेच वैद्यकीय पथकाकडून चेक पोस्ट वरच गृह,संस्थात्मक विलगीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवासी व्यक्तिने स्वत: जिल्हा सामान्य रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास, विना मास्क/रुमाल आढळून आल्यास व योग्य कारणाशिवाय दुचाकीने एकापेक्षा जास्त व्यक्ती फिरताना आढळल्यास संबंधित व्यक्तिकडून ५०० रुपये इतका दंड आकारण्यात येईल. सबब दंड वसूल करण्यास सबंधित तहसिलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी नगर परिषद,नगर पंचायत हे सक्षम अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.
रत्नागागिरी जिल्ह्यामध्ये वैद्यकीय बाबींची असलेली किमान संसाधने व खाजगी दवाखान्यात कोविड-१९ च्या अनुषंगाने उपचार होणे शक्य नसल्याने सदरची परिस्थिती आटोक्यात येण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास शंभर टक्के संचारबंदीची घोषणा करावी लागेल, असे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.