मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या गाजत असलेली 'तान्हाजी' चित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप पाहून छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. या क्लीपमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करायचा प्रयत्न झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेविरोधात गरळ ओकणारे आता कुठे गेले; 'त्या' क्लीपवरून राऊतांचा टोला
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या तानाजी चित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर केजरीवाल यांना उदयभान राठोड म्हणून दाखवण्यात आले आहे. या क्लीपमध्ये चित्रपटातील संवादही बदलण्यात आले आहेत. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवाद मोदींच्या तोंडी घालण्यात आले आहेत. तर अमित शहा हे तानाजी मालुसरे यांच्या वेशात दाखवण्यात आले आहेत.
पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.
सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांची महती सांगणारे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे शीर्षक 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' असे ठेवण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी संतप्त झाले होते. बराच गदारोळ झाल्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आले होते.