"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 

आकाश नेटके | Updated: Jul 1, 2023, 11:08 AM IST
"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान title=

Samruddhi Highway Bus Accident : शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बुलढाण्यात 33 प्रवाशांना घेऊन नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता महामार्गाच्या कामावरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दोनच दिवसांपूर्वी महत्त्वाचे विधान केले होते. या अपघातानंतर आता त्याचीच चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी संध्याकाळी विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता ही बस पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी पुण्याकडे जात होते. मात्र रात्री 1.22 मिनिटांनी पिंपळखुटा गावाजवळ ट्रॅव्हल्सचे समोरील टायर अचानक फुटल्याने बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली. त्यानंतर ट्रॅव्हल्समधल्या डिझेट टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे काही तज्ज्ञांच्या मते या महामार्गावरील रस्ते बांधकामात दोष आहे असे म्हटलं आहे. तर काहींच्या मते या अपघातांसाठी वेगमर्यादा कारणीभूत असल्याचे म्हटलं जात आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीग गडकरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. तीन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नितीन गडकरी काय म्हणाले?

"समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न विचारतात. हा महामार्ग बांधणाऱ्या 'एमएसआरडीसी' या कंपीनीचा संस्थापक मी आहे. या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे. तसेच समृद्धी महामार्ग हा राज्याचा प्रकल्प आहे. याच्याशी केंद्र सरकारचा संबंध नसला तरी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत याबाबत चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावे यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे," असे गडकरी यांनी म्हटले होते.

समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस

"समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच्या बांधकामात कोणतीही अडचण नाही. आतापर्यंत जेवढ्यापण अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये रस्त्याच्या बांधकामाचा प्रश्न आलेला नाही. कधी मानवी चूक तर कधी वाहनातील गडबड यामुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. आता आम्ही तिथे स्मार्ट सिस्टिम लावत आहोत," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.