सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन नितीन खंडेलोटे या विद्यार्थ्याने तब्बल ९७ टक्के गुण मिळवलेत. नितीनचा हा संघर्ष थक्क करणारा आहे. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातल्या शिवपुरी या छोट्याश्या खेड्यात नितीन राहतो... लहानपणीच वडील गेले, आई नितीनला घेऊन माहेरी आली. आईनं मोलमजुरी करुन नितीनचं शिक्षण केलं. नितीनलाही आईच्या कष्टांची जाण आहे.
रोज शिवपुरीहून बसनं तामसामधल्या शाळेत जावं लागायचं. नितीननं एक दिवसही शाळा चुकवली नाही... पुस्तकं घ्यायलाही धड पैसे नाहीत, अशा परिस्थितीत नितीननं जिद्दीनं अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के मिळवले. नितीनला गणितात १०० पैंकी १०० गुण, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि सामाजिक शास्त्रात ९९ गुण मिळालेत.
शिवपुरी या छोट्याशा खेड्यात अनेक वेळा वीज जायची. तेव्हा छोट्याच्या दिव्याच्या उजेडात नितीन अभ्यास करायचा... कुठलंही ठोस मार्गदर्शन नाही, शिकवणी नाही, फक्त स्वतःच नेटानं अभ्यास करुन नितीननं हे यश मिळवलंय. मंद प्रकाशात अभ्यास केल्याने नितीनला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. शिक्षकांनीच त्यावर उपाय काढला... आणि पुन्हा जोमानं अभ्यास सुरू केला.
नितीनसारख्या गुणवंतांमध्ये परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक आहे... अशा गुणवंतांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. नितीनला मदत करण्यासाठी पुढे या... सढळहस्ते नितीनसारख्या गुणवंतांना मदत करा.
परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...
संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६
पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला,
ए विंग, मॅरेथॉन टॉवर,
लोअर परळ, मुंबई - ४०००१३
ई-मेल : havisaath@gmail.com