रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीतल्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नेमकी घटना काय?
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे.
घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.
म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.