प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या (Sangli News) जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जत तालुक्यातील येळवी येथे एका तरुणाने स्वतःलाच श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपवली आहे. श्रद्धांजलीचे स्टेटस या तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) स्टेटला ठेवत आत्महत्या केली आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे सगळ्या गावात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अशाच प्रकारे आत्महत्या झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
औदुंबर विजय जगताप असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. औदुंबरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी औदुंबरने आपल्या स्वतःच्याच फोटोला श्रद्धांजलीची पोस्ट लिहून ती सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती. त्यानंतर औदुंबरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान औदुंबरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील एका तरुणानेही राहात्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले होते. हा फळविक्रेता म्हणून काम करत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने राहात्या घरात आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. योगेश फाळके असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. योगेशने आत्महत्येपूर्वी मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले होते. ते पाहून त्याच्या नातेवाईकांनी योगेशसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हतबल बापाची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका बापाने आपली जीवनयात्रा संपवली होती. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये दत्तात्रय सोरमारे यांनी गळफास घेतले स्वतःला संपवलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे दत्तात्रय सोरमारे यांनी आत्महत्येपूर्वी 'मी आत्महत्या करत आहे' अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त आत्महत्या करणाऱ्या सोरमारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.
त्री साडेदहाच्या सुमारास दत्तात्रय सोरमारे यांनी 'मी आत्महत्या करत आहे' अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन दत्तात्रय सोरमारे यांनी आत्महत्या केली. रात्री पावणे बाराच्या सुमारास सोरमारे यांनी दावरवाडी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघड झाले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी आपल्या कुटुंबाविषयी आणि मित्र परिवाराविषयी भाष्य केले होते.