पूरग्रस्तांच्या भेटीसाठी उर्मिला मातोंडकर सांगलीत

'सरकारच्या पुढेही मोठं आव्हान आहे, हे आपण समजून घ्यायला हवं'

Updated: Aug 14, 2019, 05:12 PM IST
पूरग्रस्तांच्या भेटीसाठी उर्मिला मातोंडकर सांगलीत  title=

रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : बुधवारी अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या भेटीसाठी सांगलीत दाखल झाली. पूरग्रस्तांच्या भेटीसाठी आणि मदतीसाठी रस्त्यावर उतरून उर्मिलानं त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक कलाकार किंवा एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक सामान्य व्यक्ती म्हणून मी इथं आले आहे, असं उर्मिलानं म्हटलं. इतक्या सुंदर आणि सुसंस्कृत शहरात येण्याची संधी आपल्याला पूरपरिस्थितीनंतर मिळाली ही माझ्यासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, असंही तिनं यावेळी म्हटलं. 

या अत्यंत भयानक आणि दु:खद परिस्थितीवर बोलेन तितकं कमी आहे. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की पूरग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी जे काही करता येईल ते मोठ्या प्रमाणात करावे. आम्हीही आमच्या पातळीवर नक्कीच मदत करू... सरकारनं जी काही मदत जाहीर केलीय ती अपुरी पडतेय. पण सरकारच्या पुढेही मोठं आव्हान आहे, हे आपण समजून घ्यायला हवं, मराठी भाषेत माय बाप सरकार म्हणतात त्यामुळे या मायबाप सरकारने याची दखल घ्यावी, असं म्हणत तिनं सरकारकडे मदतीची विनंती केली.  


उर्मिला मातोंडकर सांगलीत

पूरग्रस्तांना पुन्हा उभं करणं हे मोठं आव्हान आहे. आपण सर्व जणांनी मिळून मदत केली पाहिजे. मी मुंबईमधून याआधी मदत पाठवली होती आणि आता मी स्वत: ही मदत घेवून आले आहे. मी इतरांना मदतीचं आवाहन करणार नाही पण सगळ्यांनीच आपापल्या परीनं मदतीसाठी पुढे यायला हवं. मी माझ्याकडून खारिचा वाटा म्हणून ही मदत करतेय, अशी ग्वाहीही तिनं यावेळी दिली. 


उर्मिला मातोंडकर सांगलीत

मी आज जे काही आहे ते महाराष्ट्रामुळेच आहे... महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळे आहे. त्याचीच परतफेड करण्यासाठी मी आज इथे आले आहे. पक्ष-जात-पात-धर्म बाजूला ठेवून त्याच्या पलिकडे एक सर्व सामान्य माणूस पुढे येतो तशीच मी आज माणुसकीच्या नात्यानं इथं दाखल झालीय. 


उर्मिला मातोंडकर सांगलीत

विविध संस्कृतीनं नटलेल्यटा सांगलीची खरी ओळख पुसली जाऊ नये यासाठी सरकारनं आणि आपणही आपापल्या परीनं प्रयत्न करायला हवेत, असंही उर्मिलानं यावेळी म्हटलं.