संजय राठोडांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे, विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री विरोधकांच्या टीकेला आज काय उत्तर देणार याकडे लक्ष

Updated: Mar 3, 2021, 11:16 AM IST
संजय राठोडांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे, विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न title=

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून 3 दिवस झाले आहेत. मात्र राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही.  वनमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार कुणाकडे सोपवण्यात आला याबद्दल सरकारनं नोटिफिकेशनही प्रसिद्ध केलं नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वन मंत्रिपदावर कायम आहेत. 

पूजा चव्हाण प्रकरणानंतर झालेल्या आरोपांमुळे संजय राठोड अडचणीत आले. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतला होता. त्यानंतर रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. संजय राठोड यांचा राजीनामा काही फ्रेम करून लावण्यासाठी घेतलेला नाही, असं मुख्यमंत्री रविवारी म्हणाले होतं. 

आता अजूनही त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला नसल्यानं विरोधक आक्रमक झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानसभेत यावर काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधीपक्ष भाजप नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. विविध मुद्दे यावेळी उचलून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत.