Sanjay Raut On Uddhav Thackeray Security: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर घातपात घडवण्याचा कट असल्याचं सूचित केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठा घातपात करणार आहेत, असा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी, "कोणते तरुण होते, काय होते आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लमान नावं घेतली होती. या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणूका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं असं भारतीय जनता पक्षाचं षड्यंत्र आहे," असा आरोप केला.
"ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊटफूल सरकारची ती जबाबदारी नाही. हे सुडानं पेटलेलं सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे. भविष्यात काही घडलं तर ही सर्व जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याची आहे," असंही संजय राऊत म्हणाले.
तसेच, 'कांड (घातपात) होणार अशी माहिती मिळाली आहे तर कारवाई करा ना. आम्हाला काय विचारताय. ज्या पद्धतीने सुरक्षा कमी केलीय हे कोणतं राजकारण आहे. आम्ही याला घाबरणार नाही. आम्ही ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कायम तयार आहोत,' असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर घातपात घडवण्यासंदर्भातील माहिती देणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवासात घडलेला कथित घटनाक्रम सांगितला. मुंबई-गुजरात ट्रेनमध्ये 4 ते 5 मुस्लिम व्यक्तींचे संभाषण एैकून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी या व्यक्तीने फोन केला होता. हे मुस्लिम तरुण उर्दूतून संभाषण करत असल्याची दिली माहिती या व्यक्तीने दिल्याचं सांगितलं जातं. हे तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्यावर घेणार असल्याचे सांगितले नियंत्रण कक्षाला सांगण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून सुरक्षा तसेच गस्त वाढवण्यात आल्याचे समजते.