पाच दिवसांपूर्वीच गावातल्या यात्रेतून पंजाबला गेला अन्... गोळीबारात साताऱ्यातील 22 वर्षीय जवान शहीद

Punjab Bathinda camp : बुधवारी पंजाबच्या भटिंडा येथील लष्करी तळावर पहाटे मेसमध्ये झोपलेल्या चार सैनिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचाही समावेश होता. तर हा दहशतवादी हल्ला नव्हता असेही पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले होते.

Updated: Apr 15, 2023, 11:22 AM IST
पाच दिवसांपूर्वीच गावातल्या यात्रेतून पंजाबला गेला अन्... गोळीबारात साताऱ्यातील 22 वर्षीय जवान शहीद title=

Satara : दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनच्या (Punjab Bathinda camp) मेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये चार जवान शहीद (martyred) झाले होते. बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास झोपलेल्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जवान शहीद झाले होते. लष्कराच्या तोफखाना दलातील चार सैनिकांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील एक सैनिकही शहीद झाला आहे. सातारा (Satara News) जिल्ह्यातील करंदोशी (Karandoshi) गावातील तेजस लहुराज मानकर असे या 22 वर्षीय जवानाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

तेजस मानकरच्या डोक्यात गोळी लागल्याने तो शहीद झाला. तेजस पंजाबच्या भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत होता. बुधवारी झालेल्या गोळीबारात तेजसलाही गोळी लागली होती. हल्ल्यानंतर तेजसला उपचारांसाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तेजसच्या मृत्यूनंतर करंदोशी गावावर शोककळा पसरली आहे. पाच दिवसांपूर्वी तेजस गावातून भटिंडा येथे कर्तव्यावर गेला होता. मात्र त्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गावालाच धक्का बसला आहे.

तेजस करंदोशी गावात यात्रेनिमित्त काही दिवसांपूर्वीच गावात आला होता. यात्रेदरम्यान त्याने नातेवांसह मित्रपरिसोबत वेळ घालवला होता. पाच दिवसांपूर्वी तेजस पुन्हा भटिंडा येथे सेवेवर गेला होता. मात्र बुधवारी झालेल्या गोळीबारात त्याच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच गावात आलेला तेजस शहीद झाल्याचे वृत्त समजताच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तेजसच्या घरातच सैनिकी परंपरेचा वारसा होता. तेजसचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तेजसचा तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तेजसही वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यदलात सामील झाला होता. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तेजसची पंजाबच्या  भटिंडा येथील लष्करी तळावर नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, हा  लष्करी तळावर झालेला गोळीबार दहशतवादी हल्ला नसून अंतर्गत वादातून झालेला प्रकार असावा, अशी प्रतिक्रिया भटिंडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक जी. एस. खुराना यांनी दिली होती. साध्या वेशातील दोघांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले होते. घटनास्थळी इन्सास रायफलची 19 रिकामी काडतुसे सापडली होती. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच तळावरून एक इन्सास रायफल आणि 28 काडतुसे गायब झाली होती. याच रायफलने हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.