कल्याणच्या खाडीकिनाऱ्यावर सीगल या परदेशी पाहुण्यांचं आगमन

परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Updated: Dec 24, 2018, 09:07 PM IST
कल्याणच्या खाडीकिनाऱ्यावर सीगल या परदेशी पाहुण्यांचं आगमन title=

कल्याण : भयंकर जलप्रदूषणामूळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असणारा कल्याणचा खाडीकिनारा सध्या गोऱ्या गोमट्या परदेशी साहेबांच्या आगमनाने फुलून गेला आहे. शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे 'सीगल' नावाचे गोंडस परदेशी पाहुणे कल्याणात दाखल झाले आहेत. हे गोंडस पक्षी पाहण्यासाठी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कल्याणकर, पक्षीप्रेमी आणि निसर्ग छायाचित्रकारांची जुन्या खाडी पुलावर मोठी गर्दी असते. आणखी पुढचे 2 महिने म्हणजे फेब्रुवारीपर्यंत या परदेशी पाहुण्यांचा कल्याणच्या खाडी किनारा परिसरात मुक्काम असणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा हे पक्षी माघारी परततील.

सीगल पक्षी हे अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. हे पक्षी पाहण्यासाठी कल्याणकर दरवर्षी येथे मोठी गर्दी करतात. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप या पक्षाचं असतं. छोटे मासे आणि खेकडे हे या पक्षांचं मुख्य जेवण. कल्याणमध्ये मात्र त्यांना शेव, चिवडा आणि कुरकुरे खायला दिले जातात. पण या गोष्टी त्यांच्यासाठी हानीकारक ठरतात. पक्षी तज्ज्ञांच्या मते, शेव खाल्यामुळे या पक्षांना उलटी होते.