पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना 'सेल्फी'प्रेमींनी ही काळजी घ्याच...

पर्यटनस्थळांवर १६५ सेल्फी झोन आणि ७० नो सेल्फी झोन निश्चित करण्यात आलेत

Updated: Jul 9, 2019, 08:16 PM IST
पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना 'सेल्फी'प्रेमींनी ही काळजी घ्याच...  title=
असे सेल्फी घ्यायचा प्रयत्न करू नका (फाईल फोटो)

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : मंदिर नगरी नाशिकमध्ये अनेक पर्यटनस्थळं आहेत. पावसाळ्यामध्ये तिथं पर्यटकांची विशेष गर्दी असते. मात्र, अनेकदा पर्यटकांचं स्वतःवर भान राहत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात अपघात होतात. त्यामुळेच जिल्हा प्रशासनानं पर्यटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. 

कोणत्याही पर्यटनस्थळी गेलं की मोबाईलमधून सेल्फी घेण्याची अनेकांना हौस असते. त्यापायी अनेकदा लोक आपला जीव धोक्यातही घालतात. नाशिकमध्ये अशी अनेक पर्यटनस्थळं आहेत की जिथं सेल्फी घेतल्यावाचून राहावतच नाही... मात्र अशा वेळी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. त्यामुळेच नाशिक जिल्हा प्रशासनानं सेल्फी कुठे काढायचे आणि कुठे नाही हे ठरवून दिलंय.

Image result for dangerous selfie maharashtra
असे सेल्फी घ्यायचा प्रयत्न करू नका (फाईल फोटो)

पर्यटनस्थळांवर १६५ सेल्फी झोन आणि ७० नो सेल्फी झोन निश्चित करण्यात आलेत. याखेरीज

- आनंदाच्या भरात खोलवर पाण्यात जाऊ नका

- अनोळखी ठिकाणी पोहायला जाऊ नका

- मोठ्या लाटा आणि पूर असेल तर तिथं जाऊ नका

- सेल्फीच्या नादात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या

अशा सूचनाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्यात. पर्यटनस्थळी पोलिसांची विशेष पथक तैनात असतील. सोमेश्वर मंदिर, बालाजी मंदिराजवळील धबधबा, रामकुंड, तपोवन या भागात विशेष बंदोबस्त असेल. प्रशासनानं उचललेल्या या पावलाचं पर्यटकांनी स्वागत केलंय. 

नाशिकमधलं पावसाळी पर्यटन आनंदाचं आणि सुरक्षित व्हावं यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतलीय. पर्यटकांनीही याला सहकार्य करणं आवश्यक आहे.