हसन मुश्रीफांवर आणखी एका घोटाळ्याचा गंभीर आरोप; किरिट सोमय्यांची ठाकरे सरकारवर चौफेर टीका

कोल्हापूरकडे जात असताना भाजपनेते किरिट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले होते. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा नवीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Updated: Sep 20, 2021, 10:04 AM IST
हसन मुश्रीफांवर आणखी एका घोटाळ्याचा गंभीर आरोप; किरिट सोमय्यांची ठाकरे सरकारवर चौफेर टीका

कराड:  ठाकरे सरकारच्या पोलिसांनी मला बेकायदेशीर रित्या घरात डांबून ठेवले तसेच कोल्हापूरकडे जाण्यास रोखले असे भाजपनेते किरिट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते कराड येथे पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूरकडे जात असताना त्यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले होते. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा नवीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

'हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला आई अंबेचं दर्शन घेता आलेलं नाही.  ठाकरे सरकारने नवीन इतिहास रचला आहे. घोटाळेबाजांना पकडण्याऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांना पकडले आहे. मला 2700 पानांचे पुरावे घेऊन कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची आहे. तर तक्रारदारालाच तक्रार करण्यापासून रोखण्यात आलं. एवढेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातच प्रवेश बंदी केली. तक्रारदारांना तक्रार करण्यापासून रोखण्याचा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात. ' अशी टीका सोमय्या यांनी केली.

'माझा गृहमंत्र्यांना सवाल आहे की, मला काल तुमच्या पोलिसांनी गणेश विसर्जनापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान कोणत्या आदेशानुसार केलं. 4-6 तास मला घरी स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. पोलिसांना मी ऑर्डर दाखवा सांगत होतो, तरी ते दाखवत नव्हते. अखेर आमच्या वकिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. तेव्हा मला गणेश विसर्जनासाठी जाऊ देण्यात आलं. 
सीएसएमटी स्थानकाबाहेर पुन्हा मला पोलिसांनी अडवलं. माझी ट्रेन मिस व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मला धक्काबुक्की करण्यात आली. मी पोलिसांना विचारले की, तुम्ही कोणत्या आदेशाअंतर्गत मला रोखत आहात. तर, त्यांनी मला मुंबईच्या बाहेर निघण्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याचे उत्तर दिले. 
मी कराडला आल्यानंतर मला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवण्यात आला. त्यावेळी त्यात मला मुंबईच्या बाहेर निघू न देणे, घरात स्थानबद्ध करणे असा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच मुंबईतील पोलिसांना मला खोटी ऑर्डर दाखवली. असा होतो.' असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी पोलिसांवर केला.

'मला कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन करू दिले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची  ही उद्धटगिरी आम्ही खपवून घेणार नाही. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. अशाप्रकारे मला बेकायदेशीर रित्या डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. तसेच अर्धा तास सीएसएमटी स्टेशनवर मला अर्धा तास अडवणारा, दमदाटी तसेच खोटी ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलिस आय़ुक्तावर कारवाई व्हावी.' असेही त्यांनी यावेळी म्हटले.

पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले की, 'कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, 20 सप्टेंबर रोजी मुश्रीफदेखील कागलमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमू शकतो. त्यामुळे किरिट सोमय्या यांना धोका आहे. किरिट सोमय्यांना धोका आहे ही बाब अधिकृत रित्या तुम्हा मान्य करीत आहात. तर ते सुरक्षा यंत्रणांना का नाही कळवलं? हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी येणाऱ्यांमुळे मला धोका असेल तर, स्वागतासाठी मुश्रीफांचे गुंडे येणार होते की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते? की राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत?' असा खोचक सवाल सोमय्या यांनी यावेळी केला.

आणखी एका घोटाळ्याचा आरोप
हसन मुश्रीफ यांच्यावर मी इनकम टॅक्स डिपार्टमेंट, ईडी डायरेक्टर, अर्थ मंत्रालय, सहकार मंत्रालय यांकडे 2700 पानांचे घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. याप्रकरणी मुश्रीफ यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादीकडून धोका असल्याच्या धमक्या येत आहेत. 
मुळ प्रश्न हा आहे की, हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कंपनीत आलेल्या 127 कोटींचा मनी लॉंडरींगच्या पैशाचा अद्याप हिशोब का दिलेला नाही. मुश्रीफांना मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. की, आपला आप्पासाहेब नलावडे गडहिंगलज सहकारी साखर कारखान्याशी काय संबध आहे.? हा मुश्रीफ कुंटुंबियांचा दुसरा घोटाळा आहे. यातही 100 कोटींचा घोटाळा आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी या कारखान्यात पैसा घेतला आहे. ' असे म्हणत सोमय्यांनी मुश्रीफांवर दुसऱ्या घोटाळ्याचे आरोप केले.

'2020 मध्ये कोणत्याही प्रकारचे पारदर्शी बिडिंग न होता. हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा. लि. ला देण्यात आला. ब्रिक्स इंडियाला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. ही कंपनी मतीन हासिम मंगोली यांची आहे. मंगोली हे मुश्रीफांचे जावई आहेत. आमची मागणी आहे की या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी सोमय्यांनी केली.