जळगाव : १२० कोटी रुपये किंमतीच्या केटामाईनची तस्करी केल्याप्रकरणी बुधवारी जळगाव जिल्हा तसेच सत्र न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविण्यात आले. तर ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल ५ वर्षांपासून हा खटला जळगाव न्यायालयात सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
वरूण कुमार तिवारी (४२, रा. विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (५२, रा. पवई, मुंबई), नितीन चिंचोले (५६, रा. जळगाव), विकास पुरी (४८, रा. पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (४७, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रजनीश ठाकूर (५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) आणि एस.एम. सेन्थीलकुमार (४०, रा. चेन्नई) या ७ जणांना दोषी धरण्यात आले आहे. तर गौरी प्रसाद पाल ( विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी (जनकनगरी, नवी दिल्ली) आणि विलास रामचंद्र चिंचोले (जळगाव) या पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १२ डिसेंबर २०१३ रोजी जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील आयोसिंथेटीक या कंपनीत छापा मारला होता. यावेळी तेथून एका कारमध्ये प्रत्येकी ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या चार गोण्या मिळून आल्या होत्या. धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले होते. धुळ्यातून देखील एक चारचाकी जप्त केली होती. त्यातही केटामाईन मिळून आले होते.
रात्रभरातून एकूण एक हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले होते. यानंतर काही दिवस पोलिसांनी चौकशी करुन एकूण १२ संशयितांना अटक केली होती. या प्रकरणी ३ सप्टेंबर २०१६ रोजी जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात एकूण ४४ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने ७ आरोपींना दोषी ठरवले. त्यांना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.