भोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे.  

Updated: May 11, 2019, 07:39 PM IST
भोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
संग्रहित छाया

ठाणे : भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे. याप्रकरणी भोंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच भोंदूबाबा पसार झाला आहे.ललजीत सिंग तथा मंजू माताजी असे या भोंदूबाबाचे नाव आहे. तो स्वतःला वैष्णोदेवीचा मोठा भक्त असल्याचे सांगायचा. या भोंदूने टिटवाळ्याच्या मांडा भागात मोठे मंदिर उभारले आहे.

तिथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हातचलाखीने हवेतून काजू, सफरचंदामधून सिक्के, बदामामधून चांदीचे शिक्के काढून तो प्रसाद म्हणून देत होता. त्याच्या या भोंदूगिरीला भुलून उल्हासनगरच्या एका भक्ताने त्याच्या आश्रमात सेवा सुरू केली. या भक्ताच्या पत्नीची तब्येत ठीक नसल्याचे समजल्यानंतर तिच्यावर कुणीतरी करणी केली असल्याची बतावणी बाबाने केली. तसेच ही करणी उतरवण्यासाठी बाबाने भक्ताला त्याच्याशी अनेकदा अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

मात्र त्यानंतरही भक्ताच्या पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने भक्ताने बाबांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यातूनच बाबा अनेकांचे शोषण करत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे पीडित भक्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार टिटवाळा पोलीस ठाण्यात मंजू माता या भोंदूबाबाविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर हा बाबा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पांढरे यांनी दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार आल्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. तृप्ती पाटील यांनी दिली.