Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार अन् अजित पवार.. नात्यानं काका-पुतण्या. मात्र आज दोन स्वतंत्र पक्षांचे अध्यक्ष. राज्यात दोघांचे पक्ष लढत असताना दोघं मात्र बारामतीतच अडकून पडलेत.. कारण ठरलंय ते बारामती लोकसभा मतदारसंघाची पवार कुटुंबात शिरलेली निवडणूक. सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार.. अर्थात नणंद-भावजय प्रचारात शरद पवार आणि अजित पवार अडकून पडलेत. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी, सभा, मेळावे, नाराजींची समजूत काढण्यासाठीचा खटाटोप यात दोघेही कमालीचे व्यस्त आहेत. केवळ शहरी भागच नाही तर मतदारसंघातील वाड्या-वस्त्या दोघेही पिंजून काढतायत. अजित पवार बारामतीत कशाप्रकारे तळ ठोकून आहेत.
15 फेब्रुवारी 2024 - इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा
2 मार्च 2024 - नमो रोजगार मेळाव्यात अजित पवारांचं शक्तिप्रदर्शन
14 मार्च 2024 - बारामतीतील 7 गावांमध्ये मॅरेथॉन सभा
9 एप्रिल 2024 - बारामतीत गुढीपाडवा साजरा
11 एप्रिल 2024 - विजय शिवतारेंसाठी सासवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा
13 एप्रिल 2024 - बारामतीतील कार्यकर्त्यांशी पुण्यातील जिजाई बंगल्यावर संवाद
15 एप्रिल 2024 - बारामतीतील सहवास सोसायटीमधील बंगल्यावर कार्यकर्त्यांचा मेळ
बारामतीतील कुठलीही निवडणूक असोत.. प्रचाराचा नारळ फोडला की थेट शेवटच्या दिवशी समारोपाची सभा घ्यायची हा शरद पवारांचा शिरस्ता तर स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवून राज्यात फिरायचं ही अजित पवारांची रणनीती राहिलीय. यावेळी घरची लढत असल्यानं दोघांनाही बारामतीत अधिकाधिक वेळ घालवणं आवश्यक ठरतंय.
2 मार्च 2024 - नमो रोजगार मेळाव्याला हजेरी, अजित पवारांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुंग
3 मार्च 2024 - बारामती विमानतळावर मतदारसंघातील मान्यवरांसोबत संवाद
11 मार्च 2024 - डॉक्टर्स सेलच्या मेळाव्यात मार्गदर्शन
14 मार्च 2024 - बारामतीमध्ये होलार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती
22 मार्च 2024 - बारामतीतील व्यापा-यांच्या मेळाव्यात साथ देण्याचं आवाहन
8 एप्रिल 2024 - सुपा परगण्यातील दुष्काळी गावांचा दौरा
12 एप्रिल 2024 - बारामतीतील पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे, तावरे कुटुंबियांची भेट
15 एप्रिल 2024 - दौंडमध्ये जंगी सभा
विरोधी उमेदवाराच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन बड्या नेत्याला स्वत:च्या मतदारसंघात अडकवून ठेवणं हा निवडणूक रणनीतीचा भाग आहे. याआधी महादेव जानकर आणि कांचन कुल यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करुन भाजपनं पवारांना जेरीस आणलं होतं. अर्थात तेव्हा दोन्ही पवार एकत्र होते.. आता मात्र बारामतीची लढाई राजकीय राहिली नसून कौटुंबिक झाल्यानं पवार काका-पुतण्यासमोर तळ ठोकून बसण्याशिवाय गत्यंतर राहिलं नसल्याची चर्चा आहे..