पवार-ठाकरेंचं फसलेलं स्टार्टअप! 'पुन्हा त्या नादाला लागायच नाही हे ठरवलं', शरद पवारांनी सांगितला किस्सा

Thackeray Pawar Startup: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. शरद पवारांनी नुकतीच त्यातली एक आठवण सांगितली.

Pravin Dabholkar | Updated: Jul 17, 2024, 01:19 PM IST
पवार-ठाकरेंचं फसलेलं स्टार्टअप! 'पुन्हा त्या नादाला लागायच नाही हे ठरवलं', शरद पवारांनी सांगितला किस्सा title=
Sharad Pawar Rajniti Newpapwer

Thackeray Pawar Startup: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. बाळासाहेब हे माझे वैयक्तिक आयुष्यातील जवळचे मित्र आणि राजकीयदृष्ट्या मोठे विरोधक, असा उल्लेख पवारांनी याआधी केलाय. दरम्यान पवारांनी बाळासाहेबांसोबत सुरु केलेल्या आणि कालांतराने फसलेल्या व्यवसायाचा (सध्याच्या काळातला स्टार्टअप) किस्सा तुम्हाला माहितीय का?  सध्याचं युग हे स्टार्टअपचं युग आहे. आजकालचे तरुण नोकरी करण्यापेक्षा स्टार्टअप काढण्यावर भर देतात. दोन किंवा अधिक मित्र एकत्र येतात. पैसा आणि कौशल्य पणाला लावतात आणि स्टार्टअपला जन्म देतात. मित्र जेव्हा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे असतील तर काहीतरी अफलातूनच असेल याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसते. तरीपण त्यांनी सुरु केला स्टार्टअप बंद करण्याची वेळ का आली असेल? एवढेच नव्हे तर मी पुन्हा कधी त्या नादाला लागलो नाही असे पवार का म्हणाले असतील? याबद्दलची आठवण शरद पवारांनी सांगितली आहे. 

जादुगार म्हणून ओळख 

शरद पवारांनी पुण्यातील पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. माझी ओळख जादूगार म्हणून केली जातेय हे मला माहिती नव्हतं. आम्ही कॉलेज ला असताना जवळच जादूगार रघुवीर होते. आम्ही त्यांची जादू पाहण्याची संधी शोधायचो. आम्हाला ती कला काही प्रमाणात आत्मसात करता आली असं आज वाटतं असे शरद पवार म्हणाले. 

मी सकाळ मध्ये ट्रेनी म्हणून अर्ज केला होता. मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार दोघांची निवड त्यांनी केली. काही दिवस सकाळमध्ये काम करायला मिळालं. सकाळमध्ये काम करताना काही बातम्या मला अस्वस्थ करायच्या. अशावेळी आपले वर्तमान पत्र काढावे असं मला वाटायचे अशी आठवण पवारांनी गप्पांदरम्यान सांगितली. मी आणि एक दोन मित्रांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं होतं. त्याचं नाव ' नेता '. एक दोन अंक निघाले आणि नंतर त्याचे अकं निघाले नाहीत असे शरद पवार म्हणाले. 

बाळासाहेबांसोबत वर्तमानपत्र 

यावेळी शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे, मी आणि दोन मित्रांनी प्रत्येकी 5 हजार रुपये गोळा करून राजनीती नावाचं वर्तमान पत्र काढलं. आम्ही पहिला अंक काढला. बाळासाहेबांच्या एक भगिनी होत्या. त्यांच्या अंगात देवी यायची. बाळासाहेबांनी त्यांचा सल्ला घ्यायला सांगितला. त्यांनी पहिला अंक सिद्धीविनायकाला वाहायला सांगितला. त्यानुसार आम्ही तो अर्पण केला. पण नंतर तो अंक पुन्हा कधीच स्टॉल वर दिसला नाही. त्यानंतर पुन्हा कधी या नादाला लागायचे नाही हा निर्णय मी घेतल्याची आठवण पवारांनी सांगितली. हल्लीच्या काळात मीडिया आमच्या क्षेत्रात परिणामकारक आहे. समाज आणि आम्हाला त्याची उपयुक्तता आहे. परंतु कधी कधी वृत्तपत्र किंवा चॅनलमध्ये येणाऱ्या मजकुरामागे अदृश्य शक्ती असल्याचे लक्षात येते, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.