बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत बाबरी मशिद बाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 27, 2023, 06:15 PM IST
बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’ title=

Sharad Pawar On Ayodhya Ram Mandir Inauguration:  अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यावरुन देशासह राज्याच्या राजकारणात महाभारत सुरु झाले आहे. नेत्यांना देण्यात येणाऱ्या निमंत्रणावरुन वाद विवाद सुरु आहेत. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उडी घेतली आहे.  बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान केले आहे. शरद पवार यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.  

राम मंदिर उभारल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. 

राममंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलंय. सहसा मी मंदिरात जात नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राममंदिराचं भाजप राजकारण करतं की व्यवसाय माहित नाही असा टोला देखील त्यांनी लगावला.
इंडिया आघाडीचे नेते राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार की नाही?

22 जानेवारीला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.. यासाठी जगभरातल्या नेत्यांसोबत भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.. मात्र यामुळे इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलंय.. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते द्विधा मनस्थितीत दिसतायत.. राम मंदिर सोहळ्याला जायचं की नाही यावरुन या नेत्यांमध्ये गोंधळ दिसतोय.. कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.. तर निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला जाणार असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.