उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.  

Updated: Sep 12, 2019, 12:49 PM IST
उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट title=
संग्रहित छाया

मुंबई, पुणे : राष्ट्रवादीचे नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत. उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेनंतर पवारांची ही पहिली भेट आहे. उदयनराजे यांनी पक्ष सोडू नये म्हणून राष्ट्रवादीने मनधरणी केली होती. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण भाजपमध्ये येत नसल्याचे स्पष्ट केले होते, त्यानंतर आता ते पवारांची भेट घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले पवारांच्या भेटीला पोहोचले असून धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे बैठकीत आहेत.

उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध केल्याने खासदार उदयनराजे भोसले आहेत तिथेच थांबतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये जातील या चर्चांना यू-टर्न मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

दरम्यान, उदयनराजे यांनी पुण्यात भाजप प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित केली. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उदयनराजेंच्या प्रवेशाला खो घातला होता. यामुळेही उदयनराजेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला असल्याची चर्चा आहे. मात्र, उदयनराजे यांच्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. तसेच दोन गट पडले होते. त्यामुळे उदयनराजे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय झाला होता. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका, अशी विनंती केली होती.