बंधूनो म्हणाल तर... शरद पवारांची भर सभेत आमदाराला तंबी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहिर तंबी दिली आहे.

Updated: Feb 3, 2019, 05:39 PM IST
बंधूनो म्हणाल तर... शरद पवारांची भर सभेत आमदाराला तंबी title=

इंदापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहिर तंबी दिली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना 'बंधूनो' म्हणण्यावरुन शरद पवार यांनी भरणे यांना जाहिरपणे सुनावलं. तुम्ही जर ९० टक्के महिला उपस्थित असताना बंधूनो, बंधूनो म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर तुम्हाला निवडणुकीत काय होईल ते कळेल असा इशाराच पवारांनी दिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी राष्ट्रवादी की काँग्रेसला मिळणार याबाबत संभ्रम असतानाच थेट शरद पवारांनीच इंदापूरच्या आमदारांना सुनावल्यानं वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. 

इंदापूर बाजार समितीनं आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचा समारोप झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, बबनदादा शिंदे, नारायण पाटील उपस्थित होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमात भाषण करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनेकदा बंधुनो, बंधुनो असा उल्लेख केला. त्यावरून शरद पवार यांनी आपल्या भाषणात दतात्रय भरणे यांना तंबी दिली.  इथे ९० टक्के महिला आहेत हे तरी लक्षात घ्यायचं. तुम्ही जर इतक्या संख्येने महिला उपस्थित असताना बंधूनो बंधूनो म्हणाल, तर काय होईल ते तुम्हाला निवडणुकीत समजेल, अशी तंबी देत यापुढे असं काही करु नका असा सल्लाच पवारांनी आमदारांना दिला आहे.