पुणे : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीवरुन चिंता व्यक्त केल्यामुळे शरद पवारांनी याप्रकरणी टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
अन्वय नाईक यांच्या कुटुंबाची बाजू घेत शरद पवार म्हणाले, 'राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्या कुटुंबाबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं.' असं ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे राज्यपाल म्हणाले. परंतु कोरोनाकाळात अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिपब्लिक टीव्ही ( Republic TV) चे संपादक अर्णब गोस्वामी यांची अंतरिम जामिनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अंतरिम जामिनासाठी गोस्वामी यांना खालच्या कोर्टात जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.