प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : शिमगा कोकणातला मोठा सण. शिमगोत्सवाला फागपंचमीपासून सुरूवात झाली आहे. त्यानंतर आता देव भक्तांच्या भेटीला घरी येणार असल्याने कोकणात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.
कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. देवाला रूपं लावण्याची लगबग आता सुरू झाली आहे. रूपं लावल्यानंतर देव गाववेशी बाहेर जाणं इतर गावांमधल्या देवांची भेट घेण्याची प्रथा आहे. कोकणात पारंपारिक वाद्य ढोलावर थाप पडतेय. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेली आहेत. होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवाला रंग चढू लागलाय.
शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव. नोकरी धंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेला चाकरमानी या निमित्ताने आपल्या गावात परततो. गावागावातील ग्रामदेवताच्या मंदिरांचे देव्हारे आकर्षक फुलांनी सजवले गेलेत. ग्रामदेवतेला दागिन्यांचा साज चढवला गेला आहे.
ग्रामदेवतेच्या पालखीत देवाची रूप लावण्यापासून ती काढे पर्यंतचे सारे मान निश्चित असतात. शिगोत्सवात गावाचे हेच मानकरी वर्षानुवर्ष आपला मान जपत हा उत्सव साजरा करतात. ग्रामदेवतेच्या मंदिरात चाकरमान्यांसह सारा गाव जमा होतो आणि देव्हाला गाऱ्हाणं घातलं जातं. त्यानंतर पुढील महिनाभर हा शिमगोत्सव चालतो. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी पालखी सजते. काही ठराविक अंतरानंतर शिमगोत्सवाच्या प्रथा बदलतात हे देखील विशेष.
गणेशोत्सवानंतर होळी सणाला कोकणात मोठं महत्त्व आहे. गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव ख-या अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडवतो. गावागावातील आपल्या अनोख्या परंपरा जपत कोकणी माणूस या उत्सवाच्या काळात आपल्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतो.