महाराष्ट्रातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा लाभ उत्तर भारतीय बहिणींना मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'त उत्तर भारतीय महिलांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्याचं निरुपम यांनी सांगितलं आहे. रेशनकार्ड आणि डोमीसाईल सर्टीफिकेट नसलेल्या महिलांच्या पतींच्या सर्टीफिकेटवर त्यांना हा लाभ देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. उत्तर भारतीय बहुल भागात ही मोहिम राबवणार असल्याचं ते म्हणाले आहे. 40 सभा घेत मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे. लग्नानंतर जर ते येथे स्थायिक झाले असतील आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र नाही, पण पतीकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, डोमिसाईल असेल तर त्यांना लाभ मिळू शकतो. योजना तयार होत असताना त्यात ही तरतूद करण्यात आली आहे".
जास्तीत जास्त उत्तर भारतीय, गरीब महिलांना या योजनेच लाभ मिळेल याची व्यवस्था करु. ऑगस्ट महिन्यात उत्तर भारतीय जास्त असणाऱ्या मतदारसंघात जाऊन योजनेचा प्रचार करणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.
"संजय निरुपम म्हणजे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. ज्यावेळी मुख्यमंत्री असा जीआर निघाला आहे असं सांगतील, ज्यामध्ये ज्या महिलेचं नाव रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळे असं असेल तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देऊ. मला वाटतं हे संजय निरुपम यांचं दिवास्वप्न आहे. काही उत्तर भारतीयांची मतं मिळावीत किंवा राजकारणात फायदा व्हावा यासाठी खोटा प्रचार करत आहेत असं मला वाटत आहे," असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
"लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या लेकी-बाळांसाठी नाही हे समजून घ्या. महाराष्ट्राच्या महिला मतदारांना भुलवण्यासाठी ही योजना आहे. मतांवर डोळा ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. या मतांच्या समीकरणात परप्रांतीयांची गरज असेल तर ते करु शकतात. संजय निरुपम यांच्या बोलण्याला आधार आहे. कारण त्यांना भलं करायचं नसून काही करुन मतदार मिळवायचे आहेत. हे मतदार खूर्ची मिळवून देतील अशी त्यांना अपेक्षा आहे. ही योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्या कल्याणासाठी नाही, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी नवे मतदार शोधण्याची प्रलोभनीय योजना आहे," अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.