मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी संपण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठाम आहेत. सोमवारी जालन्यात दानवे आणि खोतकरांची भेट झाली. यावेळी दिलजमाई झाल्याचे मानले जात होते. मात्र खोतकरांनी आपला ताठा कायम ठेवला. काल मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र अजूनही त्यांची समजूत पटलेली नाही. आपण तयारीमध्ये खूप पुढे गेलो आहोत. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीबाबत विचार व्हावा, अशी गळ त्यांनी आता पक्षनेतृत्वाला घातली आहे. उद्या संध्याकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटविण्याची दिसत नाही. सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टाई केली मात्र, खोतकर अजुनही नाराज आहेत. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगितले. परंतु दानवे आणि खोतकर हे आपआपल्या विधानावर ठाम आहेत. खोतकर हे लोकसभा निवडणुकीची तयारी केली असून मी खूप पुढे गेलो आहे, असे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे म्हटले आहे.
राज्यमंत्री खोतकर शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेणार आहोत. या भेटीनंतरच निवडणूक लढविण्याच्या संदर्भातील आपण निर्णय घेऊ, असे खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आपल्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा आवश्यक आहे, असे ते म्हणालेत.