अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर दक्षिण मतदारसंघात एक नवाच वाद उफाळलाय. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं भाजपा उमेदवाराविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पण ही तक्रार आहे एका छायाचित्राचा गैरवापर केल्याची. हा फोटो आहे दक्षिण नागपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार मोहन मते यांचा... त्यांच्यासोबत आहेत शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया.
आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारफेरीत जाण्यात काय गैर आहे? अहो... पण कुमेरियांची सध्या एक वेगळी ओळखही आहे. ते शिवसेनेचे बंडखोर उमेदवारही आहेत याच मतदारसंघात.
सध्यातरी मते आणि कुमेरिया एकमेकांचे विरोधक आहेत. त्याचं झालं असं की, गुरुवारी मते यांची प्रचारफेरी होती. त्याच वेळी कुमेरियांची बाईक रॅली त्यांना सामोरी आली.
दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना अभिवादन केलं. मतेंनी कुमेरियांना जीपवर बोलावलं... कार्यकर्त्यांनी फोटो काढले आणि दोन्ही मोर्चे आपापल्या मार्गानं निघुनही गेले.
पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. आता कुमेरियांनी आपली उमेदवारी मागे घेत मतेंना पाठिंबा दिल्याचं म्हणत हे फोटो नागपुरात व्हायरल केले जातायत. मतेंचे समर्थक अफवा पसरवत असल्याचं सांगत कुमरेरियांनी निवडणूक आयोग आणि पोलीसांमध्ये तक्रार केली आहे.
आता कुमेरिया समर्थकांनी या पोस्टला प्रत्युत्तर देणारे मेसेज व्हायरल करायला सुरूवात केलीये. अर्थात, मतेंनी हे आरोप फेटाळलेत.
विरोधक असले तरी भेटल्यावर अभिवादन करणं ही आपली संस्कृती आहे. कुमेरियांनी थेट मतेंच्या जीपवर चढून सीमारेषा थोडी ओलांडली हे खरंय. पण याचा गैरफायदा घेऊन अफवा पसरवणं त्यापेक्षा जास्त गैर आहे.