ShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?

ShivSenaCrisis - शिवसेना नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Updated: Feb 18, 2023, 07:16 PM IST
ShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला? title=

ShivSenaCrisis and Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अर्थात शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर राज्याचे राजकारण ढवळुन निघाले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांचे अस्तित्वच पणाला लागले आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा मुद्दा उपस्थित झाला आहे.  शिवसेनेचा कोट्यवधी रुपयांचा पक्षनिधी आधीच दुसरीकडे वळवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून झी २४ तासला मिळाली आहे. 

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच शिवसेनेचा पक्षनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात जाणार असल्याची कुणकुण ठाकरेंना आधीच लागली होती. त्यामुळंच बँकेत नविन खातं उघडून या खात्यावर पक्षनिधी ट्रान्सफर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेल्यास ते पक्षनिधीवर दावा करण्याची शक्यता असल्यानं अगोदरच हा पक्षनिधी वळवण्यात आल्याचं समजते. शिंदे गट सर्व शाखा तसेच शिवालय ताब्यात घेण्याची तयारी करत आहे.

ठाकरे गटातला आणखी एक खासदार शिंदे गटात जाणार

ठाकरे गटातला आणखी एक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगासमोर सादर झालेल्या कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा समोर आला.  शिंदे गटात येणारा ठाकरे गटाचा तो खासदार कोण याच्या चर्चा आता सुरु झाल्यात.

धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरेंकडील मशाल चिन्हही जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरेंकडील मशाल चिन्हही जाण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात समता पार्टी धाव घेणार आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार आहे. ठाकरे गटाचं मशाल चिन्हं पोटनिवडणुकीपर्यंतच वैध, चिन्हाची मुदत 26 फेब्रुवारीपर्यंतच, आयोगाची ऑर्डर जारी, नव्या नावासह चिन्हाचा शोध  घ्यावा लागणार आहे. 

लोकशाहीची हत्या.... मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांचा निषेध

शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यावर आता मुंबईत आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केलाय. लोकशाहीची हत्या असा मजकूर असलेले पोस्टर्स शाखांबाहेर झळकले आहेत.