शिरूरमधून अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील?

लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना वेग आला आहे.

Updated: Jan 7, 2019, 12:46 PM IST
शिरूरमधून अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील? title=

पुणे - पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. त्यातच या मतदारसंघातून गेल्या तीन वेळेला निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अजित पवार यांचे आव्हान स्वीकारले असून, आता अजित पवारांनी शब्द फिरवू नये. त्यांनी शिरूरमधून निवडणूक लढवावीच, असे आव्हान शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले आहे. 

लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार, हे नक्की झाले आहे. आघाडीमध्ये गेल्यावेळेप्रमाणे शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. आता याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिरूरमधून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. शरद पवार यांनी होकार दिला आणि पक्षाने आदेश दिला, तर मी शिरूरमधून निवडणूक लढवेन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अजित पवार यांचे आव्हान स्वीकारले. 

पवार कुटुंबीय कायमच माझ्याविरोधात आहे. पण मी पण मराठ्याची औलाद आहे. त्यामुळे आता अजित पवार यांनी शब्द फिरवू नये. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवूनच दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला कोणीही हरवू शकत नाही, असा प्रतिहल्ला शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी अजित पवार यांच्याविरोधात चढवला आहे. 
पुनर्रचनेत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवाजीराव आढळराव-पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत. गेल्या तीन वेळा त्यांनी याच मतदारसंघातून विजयही संपादन केला होता. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला होता. तर त्यापूर्वी २००९ मधील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला होता.