'नाणार रिफायनरीच्या बाजूने बोलणाऱ्या दलालांना चपलेने झोडा'

विनाशाकडे नेणारा प्रकल्प नकोच, शिवसेनेचा पुनरुच्चार

Updated: Mar 1, 2020, 03:44 PM IST
'नाणार रिफायनरीच्या बाजूने बोलणाऱ्या दलालांना चपलेने झोडा' title=

रत्नागिरी : नाणार रिफायनरीच्या बाजूनं दलाली करणाऱ्यांना चपलेनं झोडा, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. नाणार समर्थनार्थ शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी बजावलं. तर नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या दलालांची गृह खात्याच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बजावलं. 

नाणार रिफायनरीच्या विरोधात कात्रादेवी मैदानात झालेल्या शिवसेनेच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. नाणार रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसंच नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणात नकोच, असा ठाम निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्यानंतर लगेचच नाणार प्रकल्पाची तळी उचलून धरणं शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं. शिवसेनेकडून या पदाधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली. 

'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली होती. सागवे येथील शिवसेनेचे विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह काही शिवसैनिक नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं सांगत या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता. मात्र आता आम्ही या प्रकल्पाचं समर्थन करत असल्याचं सांगत शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नाणार प्रकल्पविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलं होतं. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारचा विषय आमच्यासाठी केव्हाच संपला, असे सांगत शिवसेना नाणारविरोधी भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर शिवसेनेने नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे राजा काजवे यांची विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी झाली.