मुंबई : पवित्र रमजानच्या महिन्यात शनिवारी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात एका इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जेथे भारतीय अधिकाऱ्यांना गैरवर्तणुतीचा सामना करावा लागला. पाकिस्तानकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीचा निषेध आता सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत असतानाच पाकिस्तानच्या या कृतीवर शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून ताशेरे ओढण्यात आल आहेत.
मद्यप्राशन करुन त्याच नशेत झिंगणारं माकड, असा उल्लेख करत शिवसेनेकडून पाकिस्तानप्रतीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने पाककडून भारतीय अधिकाऱ्यांसोबत घडलेला प्रकार हा निंदास्पद असल्याचंही अग्रलेखातून म्हटले गेलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. तेव्हापासूनच पाकिस्तान आणि भारताच्या नात्यामध्ये असणारा तणाव आणखी वाढला. त्यातच मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. पण, पाकिस्तानकडून भारतासोबत शांततापूर्ण चर्चा करण्याची आग्रही भूमिका वारंवार मांडली गेली. असं असलं तरीही इफ्तार पार्टीत घडलेला प्रसंग पाहता हे खरंच शांततेसाठी पाकिस्तानकडून उचलण्यात आलेलं पाऊल आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
कर्जबाजारीपणामुळे पाकिस्तानची हतबलता आणि दहशतवादी कारवायांमुळे येथे वाढलेली अराजकता हे मुद्दे अधोरेखित करत पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांची 'फॅक्टरी'च आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवाय पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या सर्व प्रकरावर भारतीय सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीचा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्यावेळी पाकिस्तानी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याठिकाणी आलेल्या पाहुण्यांना आणि भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावून परत पाठवलं होतं. त्यांच्या या कृतीवर अनेक स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.