Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?

Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2024, 12:56 PM IST
Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार? title=

Maharashtra Bandh: उद्याचा बंद राजकीय कारणासाठी नसून विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. अनेकांना खासकरुन महिला, पालकांना आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? असं वाटत आहे. अनेक महिलांनाही कार्यालयात, रुग्णालय येथे आपण सुरक्षित असू का? असं वाटत आहे. याच खदखदीला वाचा फोडण्यासाठी हा बंद आहे. उद्याचा बंद विकृतीच्या विरोधकांनी केलेला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बस आणि लोकल सेवा बंद ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान यावर अधिकृतपणे प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलेली नाही. 

'लोकल आणि बस उद्या बंद ठेवा'

"लोकल आणि बस उद्या बंद ठेवायला हव्यात. कारण हा बंद राजकीय हेतून प्रेरित नाही. हा प्रत्येकाच्या मनातला, ह्रदयातला, घरातला प्रश्न आहे. त्यामुळे लोकल, बस बंद ठेवायला हव्या," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

'अत्यावश्यक सेवा सुरु राहतील'

"उद्याचा बंद आम्ही नागरिकांच्या वतीने करत असून तेदेखील सहभागी होती. जात, पात, धर्म या कक्षा ओलांडून सहभागी व्हा अशी माझी विनंती आहे. हा सामाजिक प्रश्न असून, आजपर्यंत झालेल्या बंदप्रमाणे असेल. हा बंद कडकडीत असायला हवा. पण या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले की, "सणासुदीचे दिवस आहेत, गपणती बाप्पा येणार आहेत, दहीडंडीचा सराव सुरु आहे. त्यामुळे उद्याचा बंद दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांना पाळावा असं माझं आवाहन आहे". 

'उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थोब़डवलं'

"सरकारने काही म्हटलं तरी मी जनतेच्या वतीने बोलत आहे. जनतेचं मत फक्त निवडणुकीपुरतं नसतं. जर काही यंत्रणांनी वेळीच कारवाई केली असती तर हा उद्रेक झाला नसता. हे आंदोलन राजकीय प्रेरित आहे, उत्स्फुर्त नव्हतं असं ज्यांना म्हणायचं आहे, तर मग हायकोर्टाने स्वत:हून जी काही दखल घेतली ती राजकारणाने प्रेरित आहे का? काल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थोब़डवलं आहे. ते थोबडवणं सुद्धा राजकारणान प्रेरित आहे का? जर उच्च न्यायालय स्वत:हून दखल घेत असेल आणि उत्सफुर्तपणे सरकारला विचारत असेल तर जनतेलाही तो हक्क आहे. जनतेचं न्यायालय वेगळं आहे. ज्यावेळी सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 

'बंद विकृती विरुद्ध संस्कृती'

उद्याच्या बंदचं यश-अपयश हे राजकारणात मोजण्याचं कारण नाही. तो बंद विकृती विरुद्ध संस्कृती आहे. राज्यातील सुजाण, सुसंस्कृत नागरिकांनी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळावा. आम्ही तुमच्या कारभारावर, माता-भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.  

'पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका'

"मनात संताप असतानाही सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करत आहे. आपल्यालाही मुली, कुटुंब आहे. त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे. त्यामुळे उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. सरकारने अताताईपणे वागू नये. बंदचा उज्जा उडवण्याचा प्रयत्न केलात तर जनता तुमचा फज्जा उडवेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.