विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दलचा तिढा सुटल्याचे जाहीर केले आहे. 

नम्रता पाटील | Updated: Jun 12, 2024, 01:55 PM IST
विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…” title=

MVA Dispute On Legislative Council Seats : मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 26 जून रोजी होणार आहेत. याची मतमोजणी 1 जुलैला होणार आहे. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दलचा तिढा सुटल्याचे जाहीर केले आहे. 

"महाविकासआघाडीत कोणताही बिघाड झालेला नाही. मी निवडणूक झाल्यानंतर बाहेर गेलो होतो. त्याकाळात तारखा जवळ आल्या होत्या. सर्व पक्षाने उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही चारही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर आज दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींसोबत फोनवर चर्चा झाली. त्यानंतर आम्ही कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दल एक समझोता करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
त्यासोबतच निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ टळू नये म्हणून आम्ही अर्ज भरले होते. पण आता आम्ही कोकण आणि नाशिकबद्दल एक निर्णय घेतला आहे. लवकरच तो निर्णय तुमच्यासमोर येईल", असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

महाविकासआघाडीतील तिढा संपला

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चारही मतदारसंघात शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर उद्धव ठाकरेंनी याबद्दल स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

"मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब हे वकील आहेत. त्यांचे वचननामा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायचे याचा संकल्प याचे लोकार्पण केलेले आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे सर्व सुशिक्षित आहेत. अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केलात म्हणून धन्यवाद, म्हणजे माझे सर्टिफिकेट हे खरं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचे प्रतिनिधीत्व केले होते", असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

"प्रामाणिकपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु"

"सुशिक्षित मतदारांचे प्रश्न वेगळे असतात. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता या अनुभवातून आणखी पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठीही काही वचने अनिल परब यांनी दिलेली आहेत. मी मुंबईतील तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले 5 टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रुपाने शिवसेनेला दिलेले आहेत. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या नात्याला आम्ही अधिक दृढ करु आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करु. मी विनंती करतोय की आतापर्यंत तुम्ही शिवसेनेला जसे आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला शिवसेनेला द्याल, अशी अपेक्षा करतो", असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कामाला जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य करा

तसेच "हे मतदान 26 जूनला आहे. या दिवशी सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाही. त्यामुळे मी मतदारांना आपण कामाला जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन कामाला जावं", अशी विनंतीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.