२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आले असते तर लोकशाही पूर्णपणे नष्ट झाली असती. 

Updated: Jan 20, 2020, 08:28 AM IST
२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते 'पीटीआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेसोबत युती करण्यास तयार नव्हत्या. मात्र, दीर्घ चर्चेनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला, असे चव्हाण यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विरोधी पक्ष संपुष्टात आणण्याचे प्रयत्न झाले. या काळात भ्रष्टाचारही मोठ्याप्रमाणावर झाला. विधानसभा निवडणुकीनंतर सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आली होती. त्यामुळे फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आले असते तर लोकशाही पूर्णपणे नष्ट झाली असती. 

सरकारी यंत्रणेमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

ही परिस्थिती ध्यानात घेऊन आम्ही पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. भाजप-शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्यानंतर मी पर्यायी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला. वैचारिकदृष्ट्या भाजप हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे सर्वांनीच पर्यायी सरकार स्थापन करण्याला दुजोरा दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, काहीशा दुय्यम स्थानावर काम करणे मला योग्य वाटले नाही. विधासभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव मला देण्यात आला होता. मात्र राजकारणात सक्रिय रहायचे असल्याने मी तो मान्य केला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.