VIDEO : हरणटोळ सापानं केली नानेटीची शिकार

शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद 

Updated: Dec 11, 2019, 09:26 AM IST
VIDEO : हरणटोळ सापानं केली नानेटीची शिकार

प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी कोल्हापूर : सापांबद्दल त्यांच्या जीवन पद्धतींबद्दल देश-विदेशात जोरदार अभ्यास सुरु आहे. या अभ्यासातून  सापांच्या जीवनातील नवनवी माहिती रोज समोर येते. अशीच एक वेगळी माहिती कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यातून पुढे आली आहे. 

झाडावर आढळणारा हा हरणटोळ साप. या निमविशारी सापानं चक्क नानेटी या सापाची शिकार केली आहे. खरंतर हरणटोळ हा साप प्रामुख्यानं सरडे, पाली, पक्षी यांची शिकार करतो. त्यानं इतर सापांना खाल्ल्याची उदाहरणं फारच दुर्मिळ आहेत. असंच एक उदाहरण कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यात पहायला मिळालं आहे. वाईल्डलाईफ फोटोग्राफर हरिष कुलकर्णी यानं हरणटोळ सापाल नानेटी सापाची शिकार करताना पाहिलं आणि त्याचं चित्रिकरण केलं.

हरणटोळच्या शिकार करण्याची पद्धत अशी आहे की, तो कुणाचा माग काढत जात नाही. झाडावरती एके ठिकाणी 5 ते 6 तास थांबून निसर्गाशी मिळतं जुळतं होतं. त्याच्या आसपास येणार जे भक्ष आहे त्यावर ते अवलंबून असतं. हरणटोळ दुसऱ्या सापाची शिकार करतो, हे चित्र दुर्मिळ असल्याचं वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हरिष कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. 

अत्यंत सडपातळ असणाऱ्या या सापानं इतर सापांनां खाल्ल्याच्या काही नोंदी आहेत. पण नानेटी सापाला खाल्ल्याची ही पहिलीच नोंद असल्याचं सरिसृप अभ्यासकांनी म्हटलंय.

हरणटोळ हा साप कितीतरी सांपाना खातो याच्या नोंदी आहेत. जमिनीखाली राहणाऱ्या खापरखवल्या या सापाला देखील हरणटोळ खातो. जमिनीवर राहणाऱ्या सांपाना देखील खाण्याच्या नोंदी आहेत. वाईल्ड स्नेक जे हलतं ते तो खातो असं सरिसृप अभ्यासक डॉ वरद गिरी यांनी सांगितलं आङे. 

निसर्गानं विशेष अशी अन्न साखळी तयार केली आहे. त्या अन्न साखळीनुसार निसर्गात घडामोडी घडतात. अभ्यासातून त्यात रोज नव नवी भर पडत आहे. त्यामुळे निसर्गातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येकानं निसर्गाचा समतोल राखणं गरजेचं आहे.