नाशकात धक्कादायक प्रकार, क्रीडा शिक्षकांनेच केला पाच मुलींवर अत्याचार

 नाशिक शहरात एका क्रीडा शिक्षकाने पाच मुलींवर अत्याचार केला. 

Updated: Mar 23, 2019, 09:41 PM IST
नाशकात धक्कादायक प्रकार, क्रीडा शिक्षकांनेच केला पाच मुलींवर अत्याचार title=

नाशिक : नाशिक शहरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढत होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी महिला पथक स्थापन केले आहे. असे असले तरी मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना आणि अत्याचार थांबले नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. एका क्रीडा शिक्षकाने पाच मुलींवर अत्याचार केला. यातील एका पीडित मुलीने शाळाही सोडली. मात्र, शाळा प्रशासन या शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठिशी घातले आहे. त्यामुळे पीडित मुलींच्या पालकांनी शाळेत येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाळा प्रशासनाने गप्प राहणे पसंत केले.

हा विनयभंगाचा आणि अत्याचाराचा प्रकार येथील भोसला मिल्ट्रीस्कूलमध्ये घडला आहे. पाच मुलींवर खेळाच्या शिक्षकाकडून शारीरिक अत्याचार करण्यात आले आहेत. दरम्यान, हे प्रकरण शाळा प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित मुलांच्या पालकांकडून शाळेत गोंधळ घातला. पोलीस प्रशासनाकडून अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आठ दिवसांपूर्वी घटना उघडकीस येऊनही संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान, एका पीडित मुलीने शाळा देखील सोडून दिली आहे. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक शहरात मुलीं आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने नाशिक शहर पोलिसांनी एक नवी संकल्पना राबविलीय. पोलीस दलातील चांगला फिटनेस असलेल्या महिला पोलीस पोलिसिंग करणार आहेत. नाशिक शहरात दिवसाला एक तरी विनयभंगाचा गुन्हा कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात महिला असुरक्षित असल्याची संतप्त भावना मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नाशिक शहर पोलिसांनी हैदराबादच्या धर्तीवर एक नवी संकल्पना राबवली आहे.