Shrirampur News : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यांविरोधात अपप्रचार करुन त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजप (BJP) नेत्याला चांगलेच महागात पडलं आहे. श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Anuradha Adik) यांची बदनामी करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते प्रकाश चित्ते (Prakash Cheetah) यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयाने भाजपचे स्थानिक पदाधिकारी प्रकाश चित्ते यांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बदनामी केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी 2021 मध्ये प्रकाश चित्ते यांच्याविरोधात श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालत पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावर दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी आदेश देत प्रकाश चित्ते यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची आदेश दिले आहेत. प्रकाश चित्ते यांनी अनुराधा आदिक यांची बदनामी केल्याचं सिद्ध होत असून यासाठी त्यांनी एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी दिले.
नेमकं काय झालं?
अहमदनगरच्या श्रीरामपूरच्या छत्रपती शिवाजी चौकात ऐन शिवजयंतीच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून प्रकाश चित्ते यांनी अनुराधा आदिक यांच्यावर आरोप करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. याविरोधात अनुराधा आदिक यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर आता न्यायालयाने आदिक यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
श्रीरामपूरच्या छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसवण्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे प्रलंबित होता. असे असतानाही शिवजयंतीच्या दिवशी 31 मार्च 2021 रोजी छत्रपती शिवाजी चौकात काही लोकांनी नियमबाह्य पद्धतीने पुतळा आणून ठेवला होता. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हा पुतळा काढला. या कारवाईचा अनुराधा आदिक यांचा संबंध नव्हता. मात्र, पुतळ्याची जागा बदलणार असल्याचा आदिक यांच्यावर खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने 4 एप्रिल 2021 रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन केले होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना प्रकाश चित्ते यांनी आदिक यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती, अशी माहिती शी माहिती अनुराधा आदिक यांचे वकील तुषार आदिक यांनी दिली होती.
अनुराधा आदिक यांच्याविषयी चुकीची माहिती दिली - तुषार आदिक
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा बदलण्याची भूमिका अनुराधा आदिक यांनी घेतली अशी चुकीची माहिती देऊन प्रकाश चित्ते यांनी चुकीची बाजू समाजामध्ये मांडली. तसेच अनुराधा आदिक यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधत श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल लागलेला आहे. या दाव्यामधील साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयाने प्रकाश चित्ते यांची बदनामी केल्याचे सांगितले आहे. तसेच प्रकाश चित्ते यांना एक कोटी रुपये मानहानीपोटी देण्याचे आदेश दिले आहेत," असेही तुषार आदिक म्हणाले.