अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नेवासा येथे मांजरीला वाचवताना सहाजण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले आहेत. बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडली आहे. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. सहाजण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. पोलीस आणी तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. यादरम्यान बुडालेल्या सहा जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बायोगॅसच्या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिला वाचवण्यासाठी एकजण खाली उतरला होता. यावेळी तो बुडू लागल्याने इतरजण मदतीला धावले. पण त्याला वाचवताना इतर सहाजणही बुडाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. दरम्यान एकाला बाहेर काढण्यात यश आलं असून, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुडालेल्या सर्वांची ओळख पटली आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी त्यांची नावं आहेत.