सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पंढरपुरात अवघ्या 38 तासांमध्ये एक सुसज्ज कोविड उपचार रुग्णालय बनवलेल आहे. पोलिसांचे काम खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असतं. रस्त्यावर नियम मोडला तर दंडुका बसलाच म्हणून समजा. मात्र सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पंढरपूर विभागाच्या पोलिसांनी एक काम केले आहे जे त्यांच्या नेहमीच्या काम पेक्षा पूर्ण वेगळे आहे.
पंढरपुरात पोट निवडणुक झाली. त्याचा परिणाम आता रुग्ण वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी बेड कमी कमी पडू लागले आहेत. सगळी उपचार करणारी हॉस्पिटल फुल्ल झाली आहेत. फ्रंट लाईन वर काम करण्याऱ्या पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे
पोलिसांच्या कडक शिस्तीचे हात पंढरपुरात मदतीसाठी पुढे आले आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पोलिस संकुल च्या इमारतीत सातारा मधील W R ग्रुपच्या टीम ने अहोरात्र झटत अवघ्या 38 तासात हे हॉस्पिटल बनवले आहे. येथे 48 ऑक्सिजन बेड आहेत. 20 इतर बेड आहेत.
या ठिकाणी पोलिसांवर अत्यल्प दरात उपचार होणार आहेत. येथे प्राधान्य फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना असले तरी सर्वसामान्य नागरिकांना सुधा येथे उपचार मिळणार आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पंढरपुरात केलेला हा उपक्रम राज्यातील कदाचित पहिलाच असू शकतो. सर्व सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीने हात पुढे आले तर कोरोनाला आपण हरवू शकतो असा विश्वास व्यक्त केला जातोय.