मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे हाल होत आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारला जाग आली आहे. आता जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लाँट (Oxygen plant at Government Hospital, Ratnagiri) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवार हे स्वतः जातीनिहाय कामाची पाहणी करत आहेत. लवकरच हा प्लाँट कार्यन्वित होईल. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठयाच्याबाबतीतला प्रश्न निकाली निघणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. तर रुग्णाच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. 13 एप्रिल ते 21 एप्रिल या आठ दिवसात तब्बल 85 कोरोबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 एप्रिलपासून 21 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात 117 मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. रत्नागिरीत कोरोना लसीकरणासाठी पूर्वनोंदणी अत्यावश्यक करण्यात आली आहे. शहरातील नागरिक लसीकरणासाठी नोंदणी करु शकतात. ऑनलाइन नोंदणीनंतरच आता लसीकरण होणार आहे. आजपासून शहरातील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही. आतापर्यंत रांग लावून लसीकरण केले जात होते. नोंदणी केल्यानंतर संबंधितांना मेसेज येईल. त्यानंतरच त्याने त्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर जायचे आहे. हा निर्णय फक्त शहरी भागातील लसीकरण केंद्रासाठीच आहे.
कोरोनाबाबत करण्यात आलेल्या आर टी -पीसीआर तपासणीबाबत असणारा अहवाल आता तपासणी करणार्या व्यक्तीला थेट त्याच्या मोबाईलवर एका लिंक द्वारे अशी व्यवस्था रत्नागिरीतील जिल्हा कोविड रुग्णालयातर्फे करण्यात आली आहे. याबाबत एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तपासणीच्यावेळी येणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक याठिकाणी नोंदवून घेतला जातो. चाचणीचा निकाल येताच संबंधित मोबाईलवर एक लिंक पाठवण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे आता तपासणी करणार्या व्यक्तीला घरबसल्या कळू शकणार आहे.