Ujani Dam Boat Tragedy: उजनी जलाशयामध्ये बोट पलटी होऊ झालेल्या अपघातामधील 6 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या 5 जणांपैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. मरण पावलेल्या या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जे पाच मृतदेह सापडले आहेत त्यामध्ये कुगाव गावातील 20 वर्षीय अनुराग उर्फ गोल्या ज्ञानदेव अवघडे या बोट चालकाच्या मृतदेहाचाही समावेश आहे. तसेच अन्य चारही मृतदेह एकाच कुटुंबातील असून चौघांचीही ओळख पटली आहे. 30 वर्षीय गोकूळ दत्तात्रय जाधवचा मृतदेह जलयाशयामध्ये सापडला आहे. तसेच गोकूळची पत्नी कोमलचाही मृतदेह सापडला आहे. कोमल ही 25 वर्षांची होती. याचबरोबर गोकूळ आणि कोमलची 3 वर्षीय मुलगी माहीचाही मृतदेह जलाशयामध्ये सापडला आहे. माहीचा दीड वर्षांचा धाकटा भाऊ शुभमचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सुद्धा बचाव पथकाला सापडला आहे. संपूर्ण जाधव कुटुंबाला जलसमाधी मिळाली असून हे कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे येथे वास्तव्यास होते. या बोटीतून प्रवास करणाऱ्या गौरव धनंजय डोंगरे हा 25 वर्षीय तरुण बेपत्ता आहे. गौरव अद्याप सापडलेला नसून राष्ट्रीय बचाव पथकाची तुकडी त्याचा शोध घेत आहे.
दुसरीकडे, अकोले तालुक्यातील सुगावजवळ सुद्धा बोट बुडाल्याने एक मोठी घटना घडली आहे. बुधवारी, येथील प्रवरा नदीमध्ये 2 जण बुडाल्याची माहिती समोर आली. यामधील एका शोधण्यासाठी गुरुवारी सकाळी आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र यावेळी नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची बोट उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पथकातील 3 जवानांचा मृत्यू झाला आहे.
अकोले तालुक्यातील प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी गेलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची बोट बुडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. यामध्ये दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले आहेत.