किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नाशिकमधल्या उद्योजकांनी एअर टॅक्सीची निर्मिती केली आहे. नाशिकमधल्या उद्योजकांनी चक्क ड्रोनप्रमाणे हवेत फिरणाऱ्या एअर टॅक्सीची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे नाशिकमधल्या सातपूर इथल्या कंपनीत या एअर टॅक्सीची निर्मिती करण्यात आली आहे. ही हवाई कार विनाचालक ताशी ७० किलोमीटर वेगाने प्रवास करते, तसंच एका वेळी चार प्रवासी किंवा ५०० किलोंपर्यंतचं वजन यातून वाहून नेता येणार आहे.
नाशिकमधील पीडीआरएल कंपनीतील अनिल चंडालिया, सौरभ जोशी, सर्वेश चिनागी, निलेश पवार, शेखर बोरसे आणि विशाल धारणकर या सहा कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा महिन्यांत मेक इन इंडियाच्या अंतर्गत ही कार साकारली आहे. मित्सुरा आर्ट फेस्टमध्ये ठेवण्यात आलेली ही एअर टॅक्सी सगळयांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
ऑटोनॉमस कॉम्प्यॅटिबिलिटी तंत्रज्ञान वापरून ही कार साकारण्यात आली आहे. आठ प्रोपलर आणि इलेक्ट्रॉनिक बॅटरीव्दारे ही एअर टॅक्सी हवेत विहार करणार आहे. प्रवासाबरोबरच नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सेवेसाठी सुद्धा या एअर टॅक्सीचा महत्वपूर्ण उपयोग होणार आहे.
या कारवर पाऊस तसंच धुक्याचा परिणाम होणार नाही. तसंच मानवविरहीत असल्यानं या वाहनाच्या मार्गक्रमाणात चुकाही होणार नसल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
या एअर टॅक्सीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि इलेक्ट्रॉनिक व्हर्टिकल लॅण्डिंग सिस्टिम असल्याने ही कार थेट आकाशात झेप घेते तसंच जमिनीवर उतरते. या एअर टॅक्सीची सेवा ऑनलाईन बुक करण्याची सुविधा आहे.
त्यासाठी विशेष ऍप बनवण्यात आलं आहे. या एअर टॅक्सीच्या प्रवासासाठी ठराविक ड्रोनपोर्टची निर्मिती केली जाणार आहे. या ड्रोन पोर्टवर चार्जिंग स्टेशनचीही निर्मिती केली जाणार आहे.
प्रदूषणाच्या दृष्टीने ही कार केलीय, अजून काही प्रयोग करून चार सीटची ही कार असेल. परवानगी मिळाली की बाजारात ही कार येईल, ड्रोन स्टेशन आले की त्यावर सर्व यंत्रणा तयार केली जाईल, हजार रुपयांचा प्रवास असेल. सर्वसामान्य लोकांना परवडणारी ही कार आहे. अशी प्रतिक्रिया पीडीआरएल कंपनीचे सीईओ अनिल चंडालिया यांनी दिली.