मुंबई : पेट्रोल-डिझेल, सिलिंडर, सीएनजीच्या दरवाढीनंतर आता एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव (ST's fare hike proposal) सादर करण्यात आला आहे. या भाडेवाढीसाठी डिझेल दरवाढीचा एसटीवर भार पडत आहे. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न होणार आहे. (ST travel will be expensive in Maharashtra )
एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यातच कोरोनाचा काळ असल्याने पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु नाही. लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अनेक मार्गावरील गाड्या बंद आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत कमी पैसे येत आहेत. दरम्यान, याआधी जून 2018 मध्ये एसटीने 18 टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाच्या 15 ते 16 हजार बस डिझेलवर धावत आहेत. पूर्ण क्षमतेने एसटी धावतात तेव्हा राज्यभरात दिवसाला एसटीला 12 लाख 500 लीटर डिझेल लागते. सध्या महामंडळाच्या 10 हजार गाड्या धावत आहेत. त्यासाठी 8 लाख लीटर डिझेल एसटीला दिवसाकाठी लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या 38 टक्के म्हणजेच 3 ते 4 हजार कोटी रुपये फक्त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
डिझेल दरवाढीमुळे याचा भार एसटीच्या उत्पानवर पडत आहे. आधीच कमी उत्पन्न आणि खर्चात जास्त वाढ यामुळे एसटी तोड्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता इंधनाचे दर शंभरीकडे वाटचाल करत असल्याने एसटीने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे.