गर्लफ्रेंडसाठी त्याने चक्क घरीच टाकला पैसे छापण्याचा कारखाना

घरच्या घरी नोटा छापायचं मशीन...

Updated: Dec 2, 2019, 09:57 PM IST
गर्लफ्रेंडसाठी त्याने चक्क घरीच टाकला पैसे छापण्याचा कारखाना

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : प्रेमासाठी लोक वाट्टेल ते करतात. औरंगाबादचा हा तरुणही त्याला अपवाद नाही. आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी, तिचे लाड पुरवण्यासाठी त्यानं जे काय केलं हे ऐकूण अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

औरंगाबादचा शेख समराण याने आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी चक्क घरीच छापखाना सुरू केला. तोही नकली नोटांचा छापण्याचा...

औरंगाबादमध्ये हा बीसीएसचं शिक्षण घेतोय, कॉलेजमध्ये त्याचं एका तरुणीशी प्रेम जुळलं. प्रेयसी रोज काही ना काही मागण्या करायची. पण त्याच्याकडे तर पैसेच नसायचे. मग काय? या बहाद्दरानं यूट्युबच्या माध्यमातून नकली नोटा छापायचं प्रशिक्षण घेतलं. आणि घरच्या घरी नोटा छापायचं मशीन टाकलं. त्या नोटांचा वापर करुन तो प्रेयसीला गिफ्ट घ्यायचा. मौजमजा करायला तो पैसा खर्च करायचा.

सुरुवातीला जिथं सीसीटीव्ही नाही किंवा भाजीबाजारात छोट्या-मोठ्या टपर्‍यांवर तो या नोटा द्यायचा आणि त्यातून सुटे पैसे मिळवायचा, रात्रीच्या वेळी तसंच कमी शिकलेल्या लोकांकडं तो त्या नोटा वापरायचा.

मात्र प्रेयसीचे लाड पुरवता पुरवता कानून के लंबे हाथ शेख समराणपर्यंत पोहोचले. याप्रकरणी त्याच्या दोन साथीदारांनाही अटक झाली. प्रेमकैदी व्हायला हरकत नाही. पण गुन्हे करून खरोखरच्या जेलमध्ये मात्र जाऊ नका.