लातूर : लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठी आणि खळबळजनक घटना घडलीय. 'स्टेप बाय स्टेप' क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील सरस्वती कॉलनी जवळील शिवाजी शाळेजवळ अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी मृत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी काही जणांची संशयित म्हणून नावंही घेतली आहेत.
गेल्या काही वर्षापासून अविनाश चव्हाण हे स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक म्हणून काम पाहतात. ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या शिकवण्या येथे चालतात. त्यांचा क्लासेस हा व्यवसाय सध्या उत्तुंग भरारी घेत असताना त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच पथकं ही तैनात केलीत.