ऊसतोड कामगाराच्या मुलाची मोठी झेप, थेट भारतीय क्रिकेट संघात निवड

कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बीडच्या या युवा क्रिकेटपटूने आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे

Updated: Aug 3, 2021, 10:40 PM IST
ऊसतोड कामगाराच्या मुलाची मोठी झेप, थेट भारतीय क्रिकेट संघात निवड

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील ऊस तोड कामगाराच्या मुलाने मोठी झेप घेत थेट भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. ज्योतीराम घुले असं या युवा क्रिकेटपटूचं नाव असून भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात त्याची निवड झाली आहे. त्याच्या कामगिरीचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. 

लहानपणापासूनच ज्योतीरामला क्रिकेटची आवड होती. आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता ज्योतीरामने कसून सराव केला. आणि त्याच्या मेहनतीला यशही मिळालं. महाराष्ट्राच्या दिव्यांग क्रिकेट संघात त्याने अनेक वेळा नेतृत्व केलं आहे. त्यानं केलेल्या कामगिरीची दखल घेत आता ज्योतीरामची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे. 

आई-वडिल ऊसतोड कामगार, त्यातच कुटुंबाची हालाखिची परिस्थिती, त्यामुळे ज्योतीरामही आपल्या आई-वडिलांबरोबर ऊसतोडीच्या कामाला जात असे. पण ज्योतीरामने जिद्द सोडली नाही. चांगल्या मैदानाचा अभाव आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन नसतानाही ज्योतीरामने स्वत:चं क्रिकेटचा सराव केला. गेली 10 ते 12 वर्ष ज्योतीरामने कसून मेहनत केली, आणि आज या कष्टाचं फळ ज्योतीरामला मिळालं

भारतीय दौऱ्यावर येणाऱ्या बांगलादेश दिव्यांग क्रिकेट संघाबरोबर एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यात चांगली कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्याचं स्वप्न ज्योतीरामने बाळगलं आहे.

ऊसतोड कामगार कुटुंबात जन्म झालेला या तरुणाने भारतीय दिव्यांग क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवलं आहे. बीडकरांच्या जोत्यीरामकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बीडचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याच्यानंतर आता प्रथमच भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्याचा बहुमान ज्योतीराम घुले याला मिळणार आहे.