अमर काणे, नागपूर : कोरोनाचं संकट पुन्हा एकदा गडद झालं असताना, नागपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, स्वतःची तिजोरी काही स्वार्थी जण भरत आहेत. विदर्भात कोरोनाचा धोका सातत्यानं वाढत आहे. मात्र नागपूरकर अजूनही सावध झालेले दिसत नाहीत. नागपूरकरांच्या बेफिकीरीचं उदाहरण समोर आलं आहे.
नागपूर शहरातल्या जुना सुभेदार ले-आऊट इथल्या एका क्लबवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांना सोबत घेऊन धाड टाकली. त्यावेळी 450 स्क्वेअर फूट खोलीत दीडशेहून जास्त लोकांनी गर्दी केलेली आढळून आलं. त्या क्लबमध्ये इम्युनिटी बूस्टर हेल्थ ड्रिंक आणि काढ्याची विक्री सुरू होती. विशेष म्हणजे हेल्थ ड्रिंक घेतल्यानंतर मास्कही लावण्याची गरज नसल्याची बतावणी या विक्रेत्यांकडून करण्यात येत होती. या प्रकरणी क्लब संचालकाला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर इन्मुनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक्सबाबत एफडीएकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.
कोरोनावर लसीखेरीज अजून पर्यंत कोणतंही औषध अस्तित्वात नाही. मात्र तरीही लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा काही जण घेत आहेत. त्याला बळी न पडता, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे.
ट्रेंडिग : मुंबई लवकरच बुडणार, अनेक संस्थांचा अभ्यासानंतर इशारा