मुंबई : तुम्ही मुंबईत राहात असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत राहून तुम्ही निसर्गाशी पंगा घेत असाल तर तुम्हाला ते महागात पडणार आहे. कारण मुंबई लवकरच बुडणार आहे, असा इशारा एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह काही संस्थांनी केलेल्या अभ्यासात देण्यात आला आहे.
वेळीच सावध व्हा, तज्ज्ञांचा इशारा
मुंबईच्या किना-यावर ऊसळी घेणा-या समुद्राच्या महाकाय लाटा पाहण्यासाठी आज अनेक पर्यटक मुंबईला येत असतात. पण या लाटा कधी त्यांची मर्यादा ओलांडतील आणि समुद्र शहरात घुसेल, हे सांगता येत नाही.... कारण तज्ज्ञांनीच तसा इशारा दिलाय. मुंबईतल्या २० टक्के किनारपट्ट्यांना पुराचा अतितीव्र धोका आहे.
२०५० पर्यंत मुंबई पाण्याखाली जाणार ?
जमिनीच्या वापरात वाट्टेल तसे बदल करण्यात आले. खारफुटीचा नाश झाला. पाण्याच्या मार्गात बांध घालून केलेली विकासकामं, नियोजनशून्य वाढतं शहरीकरण, दलदलीच्या जमिनीवरची बांधकामं, यामुळे समुद्रावर वाट्टेल तसे अत्याचार करण्यात आलेत. अशी वेगवेगळी कारण पुढे आली आहेत.
मुंबईतल्या कुर्ला, देवनार, शिवाजीनगर, ट्रॉम्बे कोळीवाडा, ठाणे खाडी, कुलाबा, बीपीटी कॉलनी, कफ परेड, वरळी, दादर चौपाटी आणि गिरगाव चौपाटीला पुराचा सर्वाधिक धोका आहे.
एकदा का निसर्गाचा पारा चढला की निसर्ग कुणाचंही ऐकत नाही. त्याच्या वाटेत येणा-यांना उध्वस्त करुन टाकतो, हे आतापर्यंत पूर, त्सुनामी, भूकंपांनी दाखवून दिलंय. आता मुंबईत समुद्र चिडायला नको असेल, तर वेळीच सावध व्हायला हवं, नाही तर मुंबईचा विनाश अटळ असेल.