Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नरेश म्हस्केंनी एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा राखली; राजन विचारेंचा पराभव

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 04:52 PM IST
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नरेश म्हस्केंनी एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा राखली; राजन विचारेंचा पराभव title=

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. शिवसेना फुटीनंतर या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या लढतीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. 

नरेश म्हस्के यांच्य़ा विजयानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य दिलं आहे. मी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम असलेला बालेकिल्ला आहे. महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी त्यांना भरभरुन प्रतिसाद दिला आणि बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यात लोकांनी विकासाला मतदान केलं आहे. राज्य सरकारने 2 वर्षात आणि मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती लोकांनी दिली आहे".

ठाणेकरांनी त्यांना जागा दाखवली आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांचा कार्यक्रम केला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत असं सांगत त्यांचंही अभिनंदन केलं. इंडिया आघाडीने मोदी हटाव या द्वेषाने पछाडले होते. पण जनतेने विकासाला मतदान केलं आहे. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना त्यांनी दूर ठेवलं आहे असंही ते म्हणाले. 

 

कसभा निवडणुकीसाठी जागावाटप होताना महायुतीमध्ये ठाण्यावरुन तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे या मतदारसंघासाठी आग्रही असताना दुसरीकडे भाजपाही या मतदारसंघावर दावा करत होतं. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात भाजपा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघ देण्यास तयार असल्याची चर्चा होती. तसंच भाजपा गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज होते. पण अखेर एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात हा मतदारसंघ पडला आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली. नरेश म्हस्के यांनाही काहीसा विरोध होत असताना त्यांनी विजयी करण्याची जबाबदारी स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.