आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : लहान बहिण सतत मोबाईलवर असल्याने मोठा भाऊ ओरडला, या क्षुल्लक कारणावरुन एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. किरण सहानी असं मृत मुलीचं नाव असून राहत्या घात तिने गळफास घेत आत्महत्या केली. डोंबिवलीतील शेलारनाका त्रिमूर्ती नगर परिसरात ही घटना घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मृत किरण ही सतत मोबाईलवर खेळत बसायची. त्यामूळे तिच्या मोठ्या भावाने जास्त मोबाईल बघू नकोस असे सांगत तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतलं आणि तो बाजूच्या घरात गेला. काही वेळाने त्याने राहत्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र घरातून बहिणीने आवाज दिला नसल्याने त्याने घरातील खिडकीतुन पाहिले असता किरण हिने छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं दिसलं.
भावाने तात्काळ आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतलं, लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पण तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
घरातील इतर सदस्य उत्तरप्रदेशात आपल्या गावी गेले होते. त्यामुळे भाऊ विक्रम आणि बहिण किरण सहानी हे दोघंच घरात होते. विक्रम वर्क फ्रॉम होम करत होता. यावेळी त्याने आपल्या बहिणीला सतता मोबाईलवर वेळ घालवू नकोस, असं ओरडला आणि त्याने मोबाईलमधलं सिमकार्ड काढून घेतलं. या ओरडण्याचा किरणला राग आला.
काही वेळाने भाऊ दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर किरणने गळफास घेत आत्महत्या केली.