कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी : महाराष्ट्राची (Maharashtra) मान शरमेनं खाली झुकवणारी बातमी. ठाणे जिल्ह्यातल्या (Thane District) भिंवडी (Bhiwandi) तालुक्यात रस्ते नसल्यामुळे एका आदिवासी महिलेच्या नवजात बाळाला जीव गमवावा लागलाय. दिघाशी गावातल्या पाड्यात रस्ते नसल्यामुळे गर्भवती आदिवासी महिलेला रुग्णालयात झोळीतून नेण्याची वेळ आली.
मात्र वेळेत रुग्णालयात न पोहचल्यानं या महिलेची झोळीत प्रसुती झाली. दर्शना महादू फरले असे या महिलेचं नाव आहे. मात्र नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागला. पावसाळ्यात या पाड्यापर्यंत कोणतंही वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे आदिवासींचे नेहमीच हाल होत असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ठाण्यासारख्या मेट्रो शहरापासून काही किलो मीटर अंतरावर अशी लज्जास्पद घटना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
पालघरमधली काही दिवसांपूर्वीची घटना
काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यातही अशीच हृदद्रावक घटना घडली होती. मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये एका गर्भवती महिलेला आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्यामुळे जुळ्या बाळांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला. एवढंच नाहीतर या महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला होता.
याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली जाणार असून, पुढच्या काही दिवसांत विचार करून उपाययोजना केल्या जातील, असं म्हटलं होतं.